Friday 23 December 2016

माझा प्रवास - 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा.

 
       
          Good morning म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सकाळी भेटतात तेव्हा एकमेकांना नम्रपणे अभिवादन करताना बोलला जाणारा आंग्ल भाषेतील शब्द. एकमेकांशी बोलण्याकरीता काहीतरी विषय असावा म्हणून सकाळच्या उल्हासपूर्ण वातावरणाचा आपल्या अभिवादनात समावेश केला असावा. आपण जेव्हा कोणत्याही, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे जातो तेव्हा संभाषणाची सुरवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. खरं तर दोघांनाही थोडेफार अवघडल्यासारखे होत असते. तेव्हा झालेली कोंडी फोडण्याकरिता एकमेकांना 'Good morning' अर्थात 'आजची सकाळ किती सुंदर आहे!!!' असं एकमेकांशी बोलून संभाषणाची सुरवात केली जाते. तसेच आपण जेव्हा कोणालाही Good morning बोलतो, तेव्हा आपण त्याला हेसुद्धा दर्शवित असतो कि माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही किंतु नाही. माझे मन स्वच्छ आहे. मी तुझ्याशी कधीही बोलायला तयार आहे. आणि मला वाटतं, Good morning बोलण्याचा हाच मोठा फायदा आहे. आपले एकमेकांशी संभाषण लगेच मनमोकळ्या आणि आनंदी वातावरणाने सुरु होते.

          शाळा संपून जशी नोकरी सुरु झाली तसा ह्या Good morning शी माझा जास्त संबंध येऊ लागला. कामावरच्या सहकाऱ्यांशी आणि साहेबांशी बोलताना, बाहेरील समाजात वावरताना, सोसायटीतील लोकांत मिसळताना, कुठल्याही समारंभांंना उपस्थित राहताना, फोनवर बोलताना माझी Good morning ची देवाणघेवाण होऊ लागली. संभाषण सुरळीत आणि उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात होऊ लागले.

          असेच दिवस जात होते. कधीकधी मराठी माणूस भेटला तर तो 'नमस्कार' बोलून संभाषणाला सुरवात करी. पण माझ्या तोंडून 'Good morning' च निघत असे. का कोण जाणे 'नमस्कार' बोलायला संकोच वाटत असे. तसं बघा!, ट्रेन, टेबल, स्टेशन, ऑफिस, हॉर्न हे आंग्ल शब्द मराठीत एवढे रुळलेत कि आगगाडी, मेज, फलाट, कार्यालय, कर्णा असं बोलणं आता आपल्याला शक्यही होणार नाही. अगदी आपण हे शब्द रेटून जरी बोलू लागलो, तर इतर लोक आपणांकडे कोणी परग्रहवासी असल्यासारखे पाहू लागतील. हळूहळू मला वाटू लागलं कि 'नमस्कार' बोलायला आपणाला संकोच का वाटायला हवा. हा तर आपल्या मराठी मातृभाषेतला शब्द आहे. आपण लहानपणी शाळेत असल्यापासून हा शब्द शिकत आलो आहे. मग तो व्यवहारात वापरायला संकोच का वाटायला हवा. झालं! तेव्हापासून कोणाच्याही 'Good morning' ला प्रतिसाद मी प्रयत्नपूर्वक 'नमस्कार'ने देऊ लागलो. 'नमस्कार' म्हटल्याबरोबर समोरची व्यक्ती जराशी स्तब्ध होई. पण नंतर लगेच 'नमस्कार'ने प्रत्युत्तर देई. मला ते फार आवडे.

          हळूहळू मी 'नमस्कार' बोलायलाही रुळलो. मग एकदा असेच वाटले कि सकाळी सकाळी आपण लोकांना 'नमस्कार' ऐवजी 'सुप्रभात' म्हणून अभिवादन केले तर!!? 'सुप्रभात' म्हटले कि माझ्या डोळ्यापुढे तो डोंगराआडून उगवणारा सूर्य, झुळूझुळू वाहणारे ओढ्याचे पाणी, तो गाईचा गोठा आणि वासरू, नांगर खांद्यावर घेऊन जाणारा तो शेतकरी, ते वाऱ्यावर डोलणारे शेत, असं प्रसन्न वाटणारे चित्र उभे राहिले. मला तो 'सुप्रभात' शब्द खूप आवडला.

          मग काय! सकाळी सकाळी मला जोही भेटे त्याला मी 'सुप्रभात'ने अभिवादन करू लागलो. समोरासमोर असो कि फोनवर, कुठल्याही ठिकाणी माझ्या तोंडून 'सुप्रभात'च निघू लागले. आता कोणीही 'Good morning' बोलो, कि 'नमश्कार'! माझा मात्र 'सुप्रभात' ठरलेला असतो. 'सुप्रभात' म्हणताना माझ्या मनात कुठेतरी सुखावल्याची, आनंदाची भावना येते. आताशा माझ्या ऑफिसमध्ये मला पाहून सगळेच 'Good morning' ऐवजी 'सुप्रभात' स्वतःच आवर्जून म्हणतात. आणि मला खात्री आहे कि ते इतर ठिकाणीसुद्धा 'सुप्रभात'च म्हणत असतील.

          असा आहे माझा 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा प्रवास.

No comments:

Post a Comment