Friday 23 December 2016

अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो


          अहो! असं रोखून काय पाहताय माझ्याकडे? मी फक्त 'वाटतो' असं लिहिलंय. साधा फुगा फोडायला घाबरणारा मी, माझी काय हिंमत दुसऱ्या कोणाचा मोबाईल फोडायची. मला आपलं त्या 'अर्चना सरकार' यांच्या 'त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो' ह्या शिर्षकावरून स्फुरण चढलं आणि देऊन टाकलं तसलंच डेअरिंगबाज शीर्षक माझ्या लेखाला. असो.
          तर माझ्या मनात असा अतिरेकी विचार का उगवला ते सांगतो. त्याचं काय ए, कि स्टेशनपासून घराकडे चालत जाताना आमच्याकडे सहा-सात फूट रुंदी असलेला, एकूण पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतराएवढा सरळसोट, लवकर न संपणारा, 'I' (आय) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे. माटुंगा स्टेशनच्या वर्कशॉपवर 'Z' (झेड) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे ना, अगदी तस्सा!

          आता होतं काय, कि त्या ब्रिजवर आपल्या पुढे किंवा मागे चालत असणारी व्यक्ती ब्रिज संपेपर्यंत पूर्ण पाच मिनिटे आपल्याबरोबरच चालत असते. आणि जरका ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असेल तर आपली काही धडगत नसते. पूर्ण पाच मिनिटे त्यांचं मोबाईलवरचं संभाषण आपल्या कानावर पडत रहातं. ना तुम्ही कान बंद करू शकता, ना त्यांचं संभाषण ऐकणं टाळू शकता. गुमान त्यांचे बोलणे ऐकत चालण्याची शिक्षा भोगावी लागते.

          अहाहा!! काय ते एक से एक, भारी भारी संवाद कानी पडत असतात. मोबाईलवर बोलणारी ती व्यक्ती ज्या वयाची, वर्गाची, लिंगाची, व्यवसायाची, स्वभावाची, पदाची, नात्याची आणि अशा बऱ्याच गोष्टींची असेल, त्याप्रमाणे संवादाचं स्वरूप बदलत रहातं. ऐकता ऐकता हळूहळू मी त्यांच्या संवादात अडकू लागतो. त्यांच्या बोलण्यात मनोमन भाग घेऊ लागतो. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या रंगरूपाची, तिथल्या परिस्थितीची कल्पना करू लागतो. मग जसा संवाद चालू असेल तसा माझा मूड बनू लागतो.

         कधी शाळकरी मुलगा मोबाईलवर आपल्या सवंगड्याशी बोलत असतो "आज शाळेतून मी कल्टी मारलेली सरांच्या लक्षातच आले नाही" तेव्हा मला त्याच्या भविष्याची चिंता वाटायला लागते. कधी एखादा कॉलेजकुमार आपल्या मित्राशी बोलत असतो "तू डरता क्यों है बे! मेरा बाप लाखों में कमाता है" हे ऐकून मला देशाचे भविष्य काळवंडताना दिसू लागतं. एखादी कॉलेजकन्यका कोणालातरी "मी नाही ज्जा! चावट कुठला!" म्हणते तेव्हा माझे कान टवकारून उभे रहातात. एखादी गृहिणी "अगं मी बाकीचं नंतर सांगते, माझं बाळ घरी वाट पहात असेल गं" म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आईची वाट बघून झोपी गेलेले बाळ दिसू लागते. एखादी म्हातारी बोलताना "बाळा, तू कधी येणार रे घरी?" अशी साद घालते, तेव्हा तिचा लष्करातला जवान मुलगा सीमेवर तैनात असलेला मला दिसू लागतो. एखादा यू पी वाला "भैसवाँ को बछडा भई गवां का?" विचारतो तेव्हा मला तबेल्यात रवंथ करणाऱ्या म्हशी दिसू लागतात. एखादा सुटेड बुटेड साहेब जोरात ओरडतो "I don't know anything! मुझे सुबह तक सब पेपर्स मेरे टेबलपर चाहिए, मतलब चाहिए" ते ऐकल्यावर मला हाग्यादम देणारा माझा साहेब डोळ्यापुढे नाचू लागतो. एखादा सिंधी बेपारी बोलत असतो "अरे साईं, तुम घबरता क्यो है? कितना माल चाहिए, सिर्फ बोलो नी!" कि मला made in usa चा माल बनवणारे कारखाने आणि त्यात काम करणारे कामगार दिसू लागतात. एखादा कष्टकरी बिगारी कामगार बोलत असतो " बोल माये बोल! म्या ऐकून राह्यलोय" कि मला चुलीवर भाकर थापणारी त्याची माउली दिसू लागते.

          एव्हढ्या वर्षांत कोणाकोणाची संभाषणं माझ्या कानी पडलीयत ती! अजून किती किती सांगू? मी घरी जायच्या घाईत, आपल्याच विचारात ब्रिजवर चालत असतो. पोटात भूक आणि जीवाला घरची ओढ लागलेली असते. आपल्या अडचणी आपल्याला काय कमी असतात, त्यात हे वेगवेगळ्या लोकांचे मोबाईलवरचे संभाषण आपण ऐकत चालायचे? कंटाळलो हो मी ह्या सर्व संभाषणांना! (कंटाळले गं बाई मी ह्या केसांना! (प्रकाशचे माक्याचे तेल) च्या चालीवर वाचा!) काय करू? कुठे जाऊ? कोणाला सांगू? (सहन होईना आणि सांगताही येईना! च्या चालीवर वाचा!) मी तुम्हाला विचारतो. तुम्हालाही असले अनुभव आलेलेे असतीलच ना? तुम्हीसुद्धा कोणा मोबाईलवर बोलणाऱ्याच्या तावडीत सापडला असालच ना? आणि काही कारणाने सुटका न झाल्याने, तुम्हाला त्यांचं संभाषण मुकाट ऐकत बसावं लागलं असेलच ना? मग मला खात्री आहे. तेव्हा तुमच्याही मनात नक्की हाच विचार आलेला असेल, कि "अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो."

No comments:

Post a Comment