Friday 10 February 2017

परदेस में निकला होगा चाँद

बालपणापासूनची माझी २५ वर्षे मध्यमुंबईत गेली. मुंबईचं जीवन अनुभवलं. आता गेली २८ एक वर्षे येथे उपनगरात राहतोय. पण सुरवातीची ५ एक वर्षे येथील जीवनाशी जुळवून घ्यायला कठीण गेली. जास्त त्रास तेव्हा होई जेव्हा होळी, गणपती, दिवाळी, नवरात्र हे सण येईत. ह्या सणांना मुंबईत केलेली धमाल आठवे. मन उदास होई, इथे एकटं, एकटं वाटे. तेव्हा वाटे 'स्वदेस में निकला होगा चाँद'.

पण एवढ्या वर्षांत आता येथे रुळलोय, रमलोय. इथल्या समाज जीवनाशी एकरूप झालोय. मुंबईच्या आठवणी येणे आता कमी झाल्यात. आता चुकून कधीतरी वाटतं, 'परदेस में निकला होगा चाँद.'

आणि मला वाटतं मनाची अशीच अवस्था सासरी रमलेल्या एखाद्या मुलीची, पोटापाण्यासाठी शहरात आयुष्य गेलेल्या स्थलांतरितांचीसुद्धा होत असावी.

Monday 6 February 2017

बाळ! तू मोठेपणी कोण होणार?


           'बाळ! तू मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. "मी ना! डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल" नाहीतर "मी ना! अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन "हो का रे लब्बाडा!" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.

          बाळ हळूहळू मोठे होई. शाळेत जायला लागे. त्याचे अनुभवविश्व विस्तारे. मग त्याचा 'मोठेपणी कोण' होण्याचा अग्रक्रम बदले. आता त्याला रोजच्या जीवनात भेटणारी माणसे जसे 'शाळेत शिकवणाऱ्या बाई', 'बस कंडक्टर', 'ट्रक/इंजिन ड्रायव्हर', मुलांना शाळेत पोहचविणारे 'रिक्षावाले काका' व्हावेसे वाटू लागे.

          काही वर्षांनी बाळ कॉलेजला जाऊ लागे. मग त्याच्या स्वप्नांना पंख फुटत. 'मोठेपणी कोण' होण्याचे मनोरथ पक्के होऊ लागत. कोणाला 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', 'संंशोधक', 'आय ए एस' असं बरंच काही व्हावंसं वाटे. त्याकरिता कोणी प्रयत्नपूर्वक तर कोणी आपलं आयुष्य वहात नेईल तसे आपले 'मोठेपणी कोण' होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करी. कोणास यश मिळे तर कोणी जीवनाशी तडजोडीचा मार्ग स्वीकारे.

          आता त्या बाळापाठच्या 'मोठेपणी तू कोण होणार?' ह्या प्रश्नाला पूर्णविराम मिळालेला असे. बाळाला लहानापासून मोठे होईपर्यंत दिवसरात्र छळणार्या त्या प्रश्नरुपी संमंधाचा आत्मा आता शांत झालेला असे.

          पण 'मी मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न एवढ्यावरच संपायला हवा का?रितिरिवाजाप्रमाणे आपण फक्त 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', किंवा 'संंशोधक' एवढेच व्हायला हवेे का? ह्या प्रश्नाचे उत्तर आपण फक्त एक पोटापाण्याची व्यवस्था करणारे एखादे साधन म्हणूनच द्यायला हवे का?

          जगात अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांना ह्या रुळलेल्या वाटांबरोबरच काही वेगळंही व्हावंसं वाटत आहे. कोणाला सदा आनंदी असणारी व्यक्ती व्हायचं आहे. राग, लोभ, मत्सर आदी षडरीपूंवर त्यांना मात करायची आहे. सदा आनंदी राहून सर्व सुखांची गुरुकिल्ली हस्तगत करायची आहे.

          कोणाला मोठं होऊनही कायम लहान बाळासारखंच रहायचं आहे. बाळाच्या दृष्टीतून सर्व जगाला पुन्हा अनुभवायचं आहे. बाळासारखं खळाळून हसायचं आहे, खेळायचं आहे.

          कोणाला असा व्यवसाय पत्करायचा आहे जो त्याच्या छंदाशीच निगडित असेल. आवडणाऱ्या छंदात रमण्याचाच त्याला मेहनताना मिळत राहील.

          कोणाला मोठेपणी 'माणूस' व्हायचं आहे. त्यांना मानवतेचा धर्म अंगिकारायचा आहे. गरजू लोकांना मदत करायची आहे. त्यांची सेवा करायची आहे.

          कोणाला गृहिणी व्हायचं आहे. अशी एक वात्सल्यपूर्ण आई व्हायचंय, जी आपल्या मुलाबाळांवर निर्व्याज्य प्रेमाचा वर्षाव करते. जी त्यांना वाढवताना स्वतःचं अस्तित्वदेखील विसरून जाते.

          कोणाला कोणीच व्हायचं नाहीए. त्यांना फक्त आजचा दिवस भरभरून जगायचा आहे. त्यांना नेहमी वर्तमानकाळातच जगायचं आहे. त्यांना उद्याच्या चिंतेच्या सावटाला स्वतःपासून दूर ठेवायचं आहे. ह्या विचाराने, कि न जाणो ह्या जगात आपण उद्या असू कि नसू.

          म्हणूनच 'बाळ, तू मोठेपणी कोण होणार?' ह्या प्रश्नाचे उत्तर 'डॉक्टर', 'इंजिनियर', किंवा 'वकील' ह्याबरोबरच अजूनही काही असू शकते. निर्विवाद सत्य आहे की 'मोठेपणी कोणीतरी' होऊन अर्थप्राप्ती करणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असू शकते, पण सर्वांचे नाही. काहींना मनाचे सुख, शांती आणि समाधान मिळवणे हेसुद्धा जीवनाचे सार वाटू शकते. काहींचे दुसर्यांकरीता आयुष्य वेचणे हेसुद्धा ध्येय असू शकते. त्यांच्याप्रमाणेच आपणही 'डॉक्टर', 'इंजिनियर', आणि 'वकील' ह्याच्याजोडीने एक वेगळा परिघाबाहेरचा विचार करायला काय हरकत आहे?

Saturday 4 February 2017

आमच्या दरवाजात पडलेला बिब्बा, लिंबू आणि मिरची.


          आपण जरकां योग्य ती खातरजमा करून घेतली नाही तर आपणांकडून कधी कधी गैरसमज होण्याची आणि त्यामुळे शेजार्यांशी असलेल्या नातेसंबंधात दुरावा होण्याची शक्यता असते. पुढे दिलेला किस्सा हा माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला आहे. तो मी त्याच्याच शब्दांत देत आहे.

          एकदा सकाळी सकाळी सौ.ने घाबऱ्या घुबऱ्याने मला झोपेतून उठवले. "अहो बघा! कोणीतरी बिब्बा, मिरच्या, कोळसा टोचलेले लिंबू आपल्या दारात आणून टाकलाय". मी धडपडत डोळे चोळत उठलो. दारात जाऊन पाहिले तर खरंच तिथे बिब्बा, मिरच्या टोचलेला एक लिंबू मला वाकुल्या दाखवत पडला होता. माझा काही भानामतीवर विश्वास नाही. तरी तो लिंबू कोणी आणून टाकला असावा याचा शोध घेणे क्रमप्राप्तच होते.

          मी आजूबाजूला जरा चौकस नजरेने पाहू लागलो. आमच्या दरवाजाला लागूनच वरच्या मजल्यावर जाण्याकरिता पायऱ्या होत्या. वर पायऱ्या संपतात तेथेच दुसऱ्या एका बिऱ्हाडाचा मुख्य दरवाजा होता. वर जाऊन आजूबाजूला नीट निरखून पाहिले तर त्या दरवाज्याच्या वरच्या चौकटीवर मधोमध एक धागा लोंबकळत होता.

          आणि तो लोंबकळणारा धागा पहाताचक्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सदर बिऱ्हाडकरूने लिंबू, मिरची, बिब्बा, कोळसा धाग्यात एकत्र गुंफलेला आणि घराला नजर लागू नये म्हणून बांधतात तसा कसलासा प्रकार दाराच्या वरच्या चौकटीला मध्ये बांधलेला होता. मध्यरात्री केव्हातरी काही कारणाने तो धागा तुटला आणि मिरची, बिब्ब्यासकट लिंबू पायरीवरून घरंगळत थेट आमच्या दारात येऊन पडला होता. आणि आम्हाला वाटत होतं की कोणीतरी मुद्दाम जादूटोणा करण्याकरिता लिंबू, मिरची, बिब्बा आमच्या दारात आणून टाकलाय.

          हे पाहून आमच्या सौ.चा जीव भांड्यात पडला. आणि अशारितीने आमचा इतरांंविषयी गैरसमज होता होता राहिला.