Saturday, 4 February 2017

आमच्या दरवाजात पडलेला बिब्बा, लिंबू आणि मिरची.


          आपण जरकां योग्य ती खातरजमा करून घेतली नाही तर आपणांकडून कधी कधी गैरसमज होण्याची आणि त्यामुळे शेजार्यांशी असलेल्या नातेसंबंधात दुरावा होण्याची शक्यता असते. पुढे दिलेला किस्सा हा माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला आहे. तो मी त्याच्याच शब्दांत देत आहे.

          एकदा सकाळी सकाळी सौ.ने घाबऱ्या घुबऱ्याने मला झोपेतून उठवले. "अहो बघा! कोणीतरी बिब्बा, मिरच्या, कोळसा टोचलेले लिंबू आपल्या दारात आणून टाकलाय". मी धडपडत डोळे चोळत उठलो. दारात जाऊन पाहिले तर खरंच तिथे बिब्बा, मिरच्या टोचलेला एक लिंबू मला वाकुल्या दाखवत पडला होता. माझा काही भानामतीवर विश्वास नाही. तरी तो लिंबू कोणी आणून टाकला असावा याचा शोध घेणे क्रमप्राप्तच होते.

          मी आजूबाजूला जरा चौकस नजरेने पाहू लागलो. आमच्या दरवाजाला लागूनच वरच्या मजल्यावर जाण्याकरिता पायऱ्या होत्या. वर पायऱ्या संपतात तेथेच दुसऱ्या एका बिऱ्हाडाचा मुख्य दरवाजा होता. वर जाऊन आजूबाजूला नीट निरखून पाहिले तर त्या दरवाज्याच्या वरच्या चौकटीवर मधोमध एक धागा लोंबकळत होता.

          आणि तो लोंबकळणारा धागा पहाताचक्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सदर बिऱ्हाडकरूने लिंबू, मिरची, बिब्बा, कोळसा धाग्यात एकत्र गुंफलेला आणि घराला नजर लागू नये म्हणून बांधतात तसा कसलासा प्रकार दाराच्या वरच्या चौकटीला मध्ये बांधलेला होता. मध्यरात्री केव्हातरी काही कारणाने तो धागा तुटला आणि मिरची, बिब्ब्यासकट लिंबू पायरीवरून घरंगळत थेट आमच्या दारात येऊन पडला होता. आणि आम्हाला वाटत होतं की कोणीतरी मुद्दाम जादूटोणा करण्याकरिता लिंबू, मिरची, बिब्बा आमच्या दारात आणून टाकलाय.

          हे पाहून आमच्या सौ.चा जीव भांड्यात पडला. आणि अशारितीने आमचा इतरांंविषयी गैरसमज होता होता राहिला.

6 comments:

 1. छ्यान गैरसमज आणि त्याचे केले निरणसं...
  खरं तर लिम्बु, मिरची, बिब्बा इत्यादि हे नैसर्गिक/ आयुर्वेदिक औषधी पैकी आहेत. ज्यामुळे कृमि, कीटक, आरोग्यास हानिकारक जीवजंतु यांचा नायनाट होण्यास उपयोग होतो. म्हणून या सर्वांचा योग्य वापर जर केला तर खरोखर नजर लागन्यासारखे आरोग्य आपण उपभोगु शकतो. परंतु काहीजण ही अन्धश्रद्धा बाळगून आहेत हे भारताचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल..

  ReplyDelete
  Replies
  1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

   आपण व्यक्त केलेल्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे.

   Delete
 2. Kharach. Andhshradha manu naye. Chhan ahe lekh.

  ReplyDelete
  Replies
  1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

   Delete
 3. Replies
  1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

   Delete