Thursday, 22 December 2016

टॅटू, मावळा, भिंगरी इत्यादी इत्यादी.

           सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर खिडकीजवळ दोन प्रौढ व्यक्ती बसतात. आणि तिसऱ्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. त्या चौघांची आधीचीच ओळख असावी. पप्पा मुलीला हाताला धरून घेऊन आले कि त्या प्रौढ व्यक्तींपैकी एकजण चॉकलेट काढून मुलीच्या हातावर प्रेमाने ठेवणार आणि ती मुलगी ते गट्टम करणार, हा रोजचा शिरस्ता.

          त्यादिवशी गाडी सुटायला अवकाश होता. मी आणि त्या प्रौढ व्यक्ती सीटवर स्थापन्न झालो होतो. थोड्यावेळाने पप्पा मुलीला घेऊन आले. बघतो तर मुलीचा चेहरा नुकताच रडून हिरमुसलेला. नेहमीप्रमाणे एका प्रौढ व्यक्तीने एक चॉकलेट काढून मुलीच्या हातावर ठेवले. मुलीचे काहीतरी बिनसलेले होते. ती चॉकलेट काही खाईना. विचारलं तर काही उत्तर देईना. आता काय करायचं? सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले. तेव्हढ्यात त्या प्रौढ व्यक्तींना काही आठवलं. आणि ते मुलीला म्हणाले. "बघ तुला एक गंमत दाखवतो." असं म्हणून त्यांनी तिच्या हातातले चॉकलेट घेतलं. त्याचं वेष्टन काढलं. आतमध्ये चॉकलेट आणि प्लास्टिकचा कुठलंसं चित्र असलेला एक छोटासा तुकडा होता. त्यांनी त्या तुकड्यावर असलेलं कसलंस पातळ आवरण काढून ते मुलीला म्हणाले "जरा तुझा हात पुढे कर बघू." मुलीने मुसमुसतच उजवा हात पुढे केला. त्यांनी तो तुकडा मुलीच्या मनगटाच्या थोडासा वर हातावर ठेवला. आणि त्यावर तळहाताचा थोडासा दाब देउन दोन तीन हलक्याशा चापट्या मारल्या. मग त्यांनी तो तुकडा हळुवारपणे उचलला. आणि मग बघतो तर काय? त्या मुलीच्या हातावर एका हसणाऱ्या जोकरचे एक छानपैकी रंगीत 'टॅटू' उमटलेले होते. ते पाहताच मुलीचा उदास चेहरा लगेच खुलला. रडका चेहरा जाऊन तिथे गोड हास्य उमटले. ती पप्पांना हात पुढे करून करून 'टॅटू' दाखवू लागली. आणि ते पाहून आम्हां सर्वांच्या चेहरयावर हसू उमटले.

          हे पाहून मला माझ्या लहानपणी चॉकलेटमध्ये मिळणाऱ्या 'टॅटूची' आठवण झाली. त्यावेळी हे तंत्र एवढं विकसित झालं नव्हतं. त्या टॅटूचा जो छोटा कागद मिळायचा. तो प्रथम पाण्यात भिजवायला लागायचा. मग तो ओला कागद मनगटाच्या वरच्या भागावर ठेऊन त्याला कितीतरी वेळ चापट्या मारीत आणि दाबीत बसायचे. मग बऱ्याच वेळाने तो कागद हळूच उचलला कि हातावर अस्पष्ट 'टॅटू' उमटलेला दिसायचा. ते बघूनच किती तो आम्हाला आनंद व्हायचा.

          पूर्वी साखरेत घोळलेल्या बडीशेपच्या छोट्या छोट्या रंगीत गोळ्यांच्या पुडीत प्लास्टिकच्या भिंगऱ्या मिळत. भिंगरी जमिनीवर जोऱ्यात फिरवून, आपण स्वतःहि जमिनीवर लोळून भिंगरीचे निरीक्षण करणे चालायचे. आणि मग कपडे मळवले म्हणून घरच्यांची बोलणी खायची. कधी त्या पूडीत प्लास्टिकच्या शिट्ट्याही येत. मग काय! आमची स्वारी दिवसभर शिट्ट्या वाजवत घरच्यांचे डोके उठवायची.

          चॉकलेट गोळ्यांच्या पूडीतच अशा छोट्या भेटी मिळत असे नाही तर भेटींमध्येच कधी कधी चॉकलेट किंवा गोळ्या भरलेल्या असत. मला आठवतंय, त्यावेळी आईस्क्रीमच्या कुठल्याशा नविन कंपनीने एका कडक प्लास्टिकच्या छोट्या पिवळ्या रंगाच्या चेंडूतच आईस्क्रीम भरून विकायला आणले होते. माझ्याजवळ असे कितीतरी प्लास्टिकचे चेंडू जमा झाले होते. आमचा क्रिकेटचा सराव अशा प्लास्टिकच्या चेंडूवरच पक्का झालेला आहे.

          तेव्हा प्लास्टिकचे स्टिकर हा प्रकार नवीनच आला होता. आता नक्की आठवत नाही, पण मला वाटते कुठल्यातरी सुपारीच्या पूडीत अगदी छोटे छोटे छान छान नक्षी असलेले स्टिकर मिळत. आम्ही ते स्टिकर मनगटी घड्याळाच्या काचेवर मधोमध लावून मिरवीत असू. अजून कशात तरी नेमप्लेटवर असायची ती प्लास्टिकची पांढरी ABCD अक्षरे मिळत. ती तर मी पुष्कळ जमा केली होती. आणि काही अक्षरे आपल्याकडे असलेल्यापैकी पुन्हा मिळाली तर ती मित्रांबरोबर अदलाबदली करायचो.

          कधी कधी चॉकलेट गोळ्यांबरोबर असलेल्या भेटी ह्या वेगळ्या दिल्या जात. ह्या भेटी म्हणजे हिरो हिरोईनचे फोटो, क्रिकेटर्सचे फोटो. प्राणी, पक्षी यांच्या छोट्या प्रतिकृती असत. एकदा मला शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांच्या छोट्या प्लास्टिकच्या बाहुल्या भेट म्हणून मिळाल्याचे आठवते. दिवाळीत मी त्यांना शिवाजीच्या किल्ल्याच्या रक्षणाकरीता उभे केले होते.

          आता मागे वळून पहाताना असे जाणवते कि चॉकलेट गोळ्यांबरोबर मिळणाऱ्या ह्या छोट्या छोट्या भेटींनी आम्हाला बालपणी फार आनंद मिळवून दिला. चॉकलेट गोळ्या खाण्यापेक्षा त्याबरोबर भेट मिळणाऱ्या वस्तूंचेच आकर्षण अधिक असायचे. निरनिराळ्या भेटी जमा करताना मित्रांबरोबर भांडणंही केलीत. मित्रांकडच्या भेटी अजाणतेपणी ढापल्याही आहेत. तर काही आवडत्या मित्रमैत्रिणींना भेट म्हणून देऊन त्यांच्यावर जीवही लावला आहे. मानवी जीवनाचे वेगवेगळे गुणविशेष आहेत. जसे कि संग्रह करणे, वस्तूंच्या निरीक्षणातून आकलन करणे, परोपकार करणे, हेवेदावे करणे, मित्रमैत्रिणींला जीव लावणे, खेळ खेळणे. आपल्या जीवनात ह्या सर्व गुणांचे संवर्धन करण्यात बालपणी चॉकलेट गोळ्यांबरोबर मिळणाऱ्या ह्या अनमोल भेटींचा मोलाचा वाटा मला नक्कीच वाटतो.       No comments:

Post a Comment