Thursday, 19 October 2017

चला! आपणही काही लिखाण करूया.आपण नेहमी पहातो की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. उदाहरणार्थ हस्तकला, चित्रकला, शिवण, टिपण, झालंच तर घरगुती कुंड्यात फुलझाडांची लागवड करणे वगैरे. ते आपला छंद जोपासत असताना पुष्कळ काही छान छान सर्जनशील गोष्टी निर्माण करीत असतात. जसे की सुंदर चित्रे, भरतकाम केलेले कपडे, वेगवेगळ्या नक्षीदार वस्तू किंवा कुंड्यात फुलवलेली सुंदर फुले इ. इ. आणि मग साहजिकच आहे, की आपण बनवलेली वस्तू चारचौघांना दाखवावी असे त्यांना वाटू लागते. लोकांकडून आपले कौतुक करून घ्यावेसे वाटते. म्हणून सर्जनशीलतेने निर्माण केलेल्या त्या वस्तूंचा फोटो काढून तो फेसबुकवर अपलोड करतात. पण त्या फोटोविषयीची थोडीफार माहिती वॉलवर लिहीत नाही. नुसताच फोटो अपलोड करतात.

परवाही असंच झालं. फेसबुकवर माझी एक छोटी मैत्रीण आहे. तिनेही खाली दिसतोय तो फोटो वॉलवर अपलोड केला. बाकी काही नाही. ना त्याची माहिती दिली, ना काही! वास्तविक त्या फोटोमध्ये 'ओरीगामी' नावाच्या एका जपानी कला प्रकाराने पेपर फोल्डिंगद्वारे छानशी फुलपाखरे करून दाखवलेली होती.

मी आपणांस सांगू इच्छितो, की मी थोडंफार लिखाण करतो, आणि इतरांनाही लिखाण करायला प्रवृत्त करत असतो, तसेच नवोदित लेखकांना प्रोत्साहनही देत असतो. असे केल्याने माझ्या मनाला कुठेतरी समाधान लाभत असते.

ह्या निमीत्ताने मला संधी आली होती माझ्या त्या छोट्या मैत्रिणीला लिहितं करण्याची. मी त्या मैत्रिणीला मेसेज केला. "अगं! तू टाकलेल्या नुसत्या फोटोवरून तो पहाणाऱ्या व्यक्तीला कसे समजणार की ते काय आहे ते? तू त्या संबंधीची काही माहिती का लिहीत नाहीस?"

ती म्हणाली "अहो काका! पण मला लिहिता येत नाही हो! आजपर्यंत मी कधी लिहिण्याचा प्रयत्नच केलेला नाही. सुरवात कुठून करायची आणि काय लिहायचं हेच मला समजत नाही"

मी म्हणालो " अगं त्यात काय मोठं! लिहायचं! आपण बनवलेल्या त्या वस्तूला काय म्हणतात, त्या कलेचं नांव काय आहे, कलेचा थोडक्यात इतिहास लिहायचा, ती वस्तू कशी बनवलीय, काय काय साहित्य लागलं, करायला किती वेळ लागला. त्याला किती खर्च आला, करताना काय काय अडचणी आल्या, मग त्या अडचणींचे निवारण कसे केले. वगैरे! वगैरे!"

ती म्हणाली "बघते प्रयत्न करून."

काल पुन्हा तिचा मला मेसेज आला, तो तसाच खाली देत आहे.

"नमस्कार सचिन काका!
मी काल थोडाफार प्रयत्न केला 
लिहिण्याचा. पण जमत नाही आहे.
मी जे काही बनवलंय त्यांची 
कृती कशी लिहू तेच समजत 
नाहिये. त्यामुळे दुसऱ्या 
कुठल्यातरी विषयावर लिहायचा 
प्रयत्न करतेय. बघूया आता ते 
तरी जमतंय का ते.. 
लिहून झालं कि तुम्हाला आधी 
मेल करेन :)


तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक 
शुभेच्छा!!"


आता मी म्हटलं, लिहिता येत नाही म्हणून ती फारच निराश झालेली दिसतेय. तिचा उत्साह वाढवण्याकरिता काहीतरी करायला हवे. म्हणून मी तिला पुन्हा खालीलप्रमाणे मेसेज केला.

" XXX हिस,

सप्रेम नमस्कार, अगं तू लिखाण करण्याचं फार टेन्शन वगैरे घेतलंयस की काय!!!? मला माफ कर, मी तुला जरा जास्तंच आग्रह केला असे वाटते. तू लिहिती व्हावी ही माझी इच्छा होती. आणि लिहिण्याचा विषयही तुला चालून आला होता. असो, तू लिहिण्याचा प्रयत्न करून पाहिलास याचाच मला फार आनंद आहे.

लिखाण करणं अगदीच सोपं असतं गं! आपण मनात बोलतो ना? बस्! तेच फक्त भराभर लिहून काढायचं असतं. आपण शाळेत नाही का निबंध लिहीत होतो. अगदी तसंच! लिहिणं सोपं व्हावं म्हणून मी तुला मुद्दाम काही प्रश्न दिले होते. त्या प्रश्नांची फक्त तू सलग उत्तरंही जरी लिहिली असती तरी चालले असते. काहीतरी एक छोटाखाणी लेख तयार झाला असता.

त्याचं काय आहे, की आपण इतर लोकं काय म्हणतील यालाच घाबरत असतो गं! पण आपल्याला कधीतरी सुरवात करावी लागतेच ना!? नाहीतर आपल्या मनातल्या इच्छा मनातच राहून जातात. अगं, मीसुद्धा पूर्वी ह्याच परिस्थितीतून गेलेलो आहे.

आता तू दुसरा विषय घेऊन लिहायचा प्रयत्न करतेयस ही फारच चांगली गोष्ट आहे. लिहायचं टेन्शन मात्र घेऊ नकोस. पाहिजे तेवढा वेळ घे. पण लिखाण पूर्ण केल्यावर आपल्याला कित्ती आनंद मिळतो याचा अनुभव मात्र नक्की घे.

पुढील लिखाणाच्या तुला खूप खूप शुभेच्छा! आणि हो! तुला शुभ दीपावलीसुद्धा!

एक गंमत सांगू!!? तुला हे सर्व सांगताना माझ्याकडून 'एका नवोदित लेखिकेला लिहिण्यास उत्तेजन देणारे पत्र लिहा' असा एक निबंधच लिहून झाला की !!!?

बघ!!! एवढं सोप्प आहे लिखाण करणं. खालीपिली टेन्शन लेनेका नाय!!!
हा! हा!! हा!!


--- सचिन काळे."

तिला मी वरील मेसेज पाठवून दोन दिवस झालेत, पण अजूनपर्यंत तिचे पुढे काही उत्तर आलेले नाही. पण लवकरच तिने काहीतरी छान लिखाण केल्याचा मेल येईल याची मला शंभर टक्के खात्री आहे.

आता आमच्यात झालेलं हेे संभाषण तुम्हां सर्वांना सांगण्याचे कारण म्हणजे हे वाचून वाचकांपैकी कोणी एकानेही दोन शब्द लिहिण्याकरिता स्फूर्ती घेतली आणि लिखाण करण्यास सुरवात केली, तर माझ्या हातून काही चांगले घडल्याचे मला नक्कीच समाधान मिळेल.

तर मग!? करताय ना सुरवात लिखाण करायला. आणि हो! तुमचा शुभारंभाचा लेख मला पाठवायला मात्र विसरू नका बरं का!! सर्व वाचकांना माझ्याकडून सुंदर लिखाणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ दीपावलीसुद्धा!!!

2 comments:

  1. Replies
    1. जरूर लिहिण्याचा प्रयत्न करून पहा. तुम्हाला नक्की जमेल.

      Delete