Sunday, 28 May 2017

साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा!!!          पावसाच्या वर्षावात न्हायला सर्वांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही.

          त्याचे असे झाले, की मी एकदा लोकलट्रेनने सकाळी साधारण सात साडेसात वाजता गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करीत होतो. अशावेळी गाडीत अगदी तुरळक माणसे असतात. त्यातले बरेचसे रात्रपाळी करून, डुलक्या काढत घरी जाणारे असतात. आणि जे जागे असतात तेही पेंगूळलेल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत शांत बसलेले असतात. गाडी सुसाट पळत असते. नुकताच सूर्योदय होत आलेला असतो. मस्त गार वारा अंगाला झोंबत असतो.

          तर अश्या या रम्य वातावरणात मी गाडीच्या डब्यात तिसऱ्या सीटवर कडेला बसलो होतो. मध्ये, माझ्या बाजूला छान कडक इस्त्री केलेला सफारी घातलेला एक तरुण, आणि त्याच्या बाजूला सुंदर शालू नेसलेली एक तरुणी खिडकीत बसलेली होती. त्यांच्या एकंदर अभिर्भावावरून त्यांचं नुकतंच लग्न झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. ते जोडपं एवढं सजून धजून कदाचित कोण्या नातेवाईकाकडे किंवा देवदर्शनाला चाललेले वाटत होते.

          आणि आमच्या समोरच्याच सीटवर खिडकीच्या कोपऱ्यात एक साधू एकटाच बसलेला होता. काय त्याचे राजबिंडे रूप वर्णावे!! अगदी गोरागोमटा, चांगली सहा फूट उंची, घारे डोळे, डोक्याचे टक्कल केलेले, छोटुशी शेंडी, तुळतुळीत दाढी, बारीक काड्यांचा चष्मा, नाकाच्या मध्यापासून थेट कपाळाच्या सुरवातीपर्यंत चंदनाचा जाडसर गंध ओढलेला, अंगात भडक भगवा सदरा, गळ्यात प्रिंटेड उपरणे आणि कंबरेला धोतर गुंडाळलेले होते. तो लोकलट्रेनमध्ये अगदी नवखा वाटत होता. सारखा बावरून खिडकीबाहेर भिरभिरत्या नजरेने पहात होता. कुठे उतरायचं होतं कोण जाणे त्याला? मी आणि माझे सहप्रवासी अधूनमधून हळूच त्याला चोरट्या नजरेने दबकून पहात होते.

          स्टेशनांमागून स्टेशनस् जात होती. माझ्या बाजूच्या जोडप्याचं आपसात लाडेलाडे बोलणं चालू होतं. माझ्या डोळ्यांवरसुद्धा पेंग यायला लागली होती. गाडी हळूहळू मुलुंड स्टेशनवर येऊन गचका देऊन थांबली. आणि अचानक ते घडलं.....

          त्या साधूने गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. आणि आपल्या समोरील जोडप्यातील तरुणाला विचारलं. "Mulund?" तरुणाने होकारार्थी मान डोलावली. त्याबरोबर तो साधू एकदम बावचळला. गाडी आता सुरू होणार होती. त्याला मुलुंड स्टेशनवरच उतरायचे होते. तो ताडकन् उभा राहिला. काहीतरी आठवल्याबरोबर पुन्हा सीटवर बसला. आणि आपल्या सीटखाली ओणवा झाला. दुधवाल्यांकडे असते तशी, पण साधारण पाच सहा लिटरची, प्योर चकचकीत स्टीलची, धरायला गोल कडी असलेली किटली त्याने सीटखाली ठेवलेली होती. त्याने उतरायच्या घाईत किटलीच्या कडीला धरले आणि किटली पट्कन जोरात बाहेर ओढली.

          आणि हाय रामा!!! जे कधी आयुष्यात पाहिले नव्हते असं आक्रीत घडलं. त्याने किटलीच्या कडीला धरून ओढल्याबरोबर, किटलीच्या झाकणाचे उंच टोक सीटच्या कडेला अडकून फट्कन झाकण उडाले आणि किटलीला जोराचा झटका बसल्याने किटली तिरकी ओढली जाऊन आत असलेला जवळ जवळ निम्मा द्रवपदार्थ समोर बसलेल्या कडक सफारी घातलेल्या आणि सुंदर शालू नेसलेल्या, तरुण आणि तरुणीच्या अंगावर उपडा झाला. कोणता होता तो द्रवपदार्थ सांगू!!!?

          त्या तरुण आणि तरुणीच्या अंगावर उपडा झालेला द्रवपदार्थ होता....आंब्याचा गारेगार रस....'आमरस'....!!!!! होय! तो घट्ट आमरसच होता. ज्यात तो तरुण आणि तरुणी नखशिखांत माखून निघाले होते. त्याचा सफारी आणि तिचा शालू आमरसात पार चिंब भिजले होते. डब्यात सर्वत्र आंब्यांचा सुगंध पसरला. अचानक झालेल्या ह्या 'आमरसाच्या अमृतधारे'च्या वर्षावाने दोघेही अवाक् झाले. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना. किटली आपटल्याच्या आवाजाने आणि आंब्यांच्या सुवासाने डब्यातल्या सहप्रवाशांचीही डोळ्यावरची झोप उडाली. सर्व एकमेकांकडे काय झाले म्हणून बघू लागले. उपासतापास करणारा एखादा साधू एवढा पाच सहा लिटर आमरस घेऊन प्रवास करत असेल ह्यावर कोणाचाही विश्वास बसेना. कुठे नेत असेल तो एवढा आमरस? कोणाकरिता नेत असेल? एवढया आमरसाचं तो काय करणार असेल? सर्वांनाच प्रश्न  पडला होता. घडलेला प्रसंग पाहून काहींच्या चेहऱ्यावर हसू फुटायचेच तेवढे बाकी राहिले होते.

          झालेल्या गोंधळाचा त्या साधूने फायदा घेतला. त्याला समजायला वेळ नाही लागला, की आपण 'सॉरी' बोलायला थांबलो तर आपणच अडचणीत येऊ. त्याने पडलेली अर्धी रिकामी किटली उचलली. त्याला झाकण लावले. आणि तो उतरण्याकरिता दरवाज्याकडे पळाला. तोपर्यंत गाडीने हळूहळू धावायला सुरवात केली होती. पण त्या साधूने चालू गाडीतून रिकाम्या किटलीसकट स्टेशनवर झट्कन उडी मारली.

          आता आम्हां सर्वांचे लक्ष त्या तरुण आणि तरुणीकडे लागले, जे आपल्याकडील रुमालाने आपल्या अंगावरचा आमरस स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्याशिवाय तो स्वच्छ होणे कठीण होते. त्यामुळे पुढील ठाणे स्टेशन आल्याबरोबर दोघांनी गाडीतून उतरून घेतले. आणि इथे गाडीच्या डब्यात आम्ही सर्व एकमेकांना एकच प्रश्न विचारत होतोे. "वो साधू इतना आमरस लेके कहाँ जा रहा था?" नंतर कितीतरी वेळ डब्यात हास्याचा धबधबा कोसळत होता.

          अशातऱ्हेने आम्हाला 'आमरसाच्या अमृतधारां'चा वर्षाव अनुभवायला मिळाला. इतक्या वर्षांनंतर अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या चेहऱ्यावर हसू उमटते.


2 comments:

  1. Aamrasa cha asa kadhi Tari kharach pavus padla pahije.nidan je arasik ahet te pan pavsat bhijayala yetil.😂😁😀

    ReplyDelete
  2. वा:, आमरसाच्या पावसाची फारच सुंदर कल्पना मांडलीत आपण!!! लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

    ReplyDelete