Monday 11 June 2018

एक उनाड संध्याकाळ



एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या"

मग काय? ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू. पण मग आठवले. कामावर थांबलो तर भेटणाऱ्या प्रत्येकाला उशिरापर्यंत थांबण्याचे कारण समजावून सांगताना नाकी नऊ येणार. तसंच घरी जाताना ट्रेनला गर्दीही वाढत जाणार होती. ट्रेनला होणाऱ्या गर्दीचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. म्हणून मी ऑफिसमधून सुटल्याबरोबर माझी नेहमीची गाडी पकडली.

गाडीत बसल्या बसल्या मी हा तास दीडतासाचा वेळ कसा काढायचा याचा विचार करू लागलो. तीनचार तास काढायचे असते तर नाटक सिनेमा वगैरेचा तरी बेत केला असता. पण मला दीडदोन तासच काढायचे होते. बाकीचा वेळ उगाच फुकट गेला असता. बरं दुसऱ्या दिवशी लवकर उठून परत कामावर जायचे होते. त्यामुळे मी तो विचार रहित केला. बाजारात खरेदी वगैरे काही करायची नसल्याने तसाही वेळ काढणे शक्य नव्हते. बरं विंडो शॉपिंग करण्यात मला काही रस नसतो. ज्या गावी जायचे नाही त्या गावचा रस्ता का पहा? देवळात, बागेत वेळ काढायचा म्हटले तरी तिथे एकट्याने जाण्यात काही मजा नव्हती. आणि तसंही म्हटलं तर कल्याणमध्ये देवळं आणि बागांची वानवाच आहे. संसारी माणसाला मित्रमंडळीही अशीही कमीच असतात. आणि आता नेमके ती घरी भेटण्याची शक्यताही नव्हती. वेळ कसा काढायचा हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलं. पण निर्णय काही होईना.

आणि पहाता पहाता कल्याण स्टेशन आलेसुद्धा. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. काहीच ठरलेले नसल्याने मला समजेना की मी डावीकडे जाऊ की उजवीकडे? मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी जाणारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार? संपल्या लवकर. मी पूलावर आलो. पूलाचं एक टोक माझ्या घराच्या दिशेने जात होते. तिथून माझे घर मला खुणावत होते. पण मी मोठ्या अनिच्छेनेच दुसऱ्या टोकाच्या दिशेला वळलो. मी शक्य होईल तितके सावकाश पावलं टाकत चालत होतो. पूल जिथे संपतो त्या टोकाला मी जाऊन उभा राहिलो. खाली वाकून पाहिले तर तिथून बाजाराची सुरवात होताना दिसत होती.

मनात म्हटलं, चला! बाजारात चक्कर मारून वेळ काढू. पुन्हा मी शक्य तितके सावकाश पायऱ्या मोजत मोजत खाली उतरलो. बाजार चांगलाच फुललेला होता. रस्त्याकडेला भाजी, फळे विकणारे ओरडून ओरडून माल विकत होते. गिऱ्हाईकांशी हमरीतुमरीवर येऊन मालाचा सौदा करत होते. दुकानांच्या बाहेर माल लटकवलेला होता. त्यांच्या शोकेस नवीन मालांनी सजवलेल्या होत्या. रिक्षा, बस, मोटारगाड्या गर्दीतून हॉर्न वाजवत वाट काढत होत्या. सर्वत्र गडबड गोंधळ चालू होता. आणि मी शक्य तितक्या सावकाश पाय उचलत बाजारात चालत होतो. जो कोणी आडवा येईल, त्याला मोठ्या अदबीने आणि औंदार्याने प्रथम जायला वाट करून देत होतो. निरपेक्ष वृत्तीने दुकानांच्या शोकेसकडे पहात होतो. बाजाराला शक्य तितका मोठ्ठा वळसा घालून पुन्हा स्टेशनच्या पूलाजवळ येऊन पोहोचलो. हातातल्या घड्याळाकडे पाहिले. अरेरे!! मुश्किलीने फक्त अर्धा तास उलटला होता.

म्हटलं, इकडेतिकडे विनाकारण हिंडत बसायला नको. सरळ घरीच जाऊया. सावकाश जाऊ म्हणजे वेळ निघेल. मी पुन्हा पूल चढून वर आलो. आणि घराच्या दिशेने निघालो. पूलावरून रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीचे डब्बे मोजले. उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाचे बारकाईने निरीक्षण केले. यार्डातल्या तीस चाळीस लाईनी मोजून घेतल्या. चांगला वेळ गेला. आता घरच्या रस्त्याला लागलो. दुतर्फा फेरीवाले आपला माल लावून बसले होते. त्यांच्या मालाचे निरीक्षण करत चालू लागलो. कोण काय विकत घेतंय ते पाहू लागलो. दुकानात असलेल्या गिऱ्हाईकांकडे पाहून घेतले. पुन्हा बरा वेळ गेला.

असं करत करत आमच्या बिल्डिंगजवळ येऊन पोहोचलो. बिल्डिंगमध्ये शिरतेवेळी आमचे शेजारी नेमके भेटले. त्यांच्याशी हवापाण्याच्या गोष्टी बोलता बोलता घराच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि थबकलोच. दरवाजात दहा बारा चपलांचा ढीग पडलेला होता. बंद दरवाजातून बायकांचा जोरजोरात हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. आणि मला आठवले. मिसेस म्हणाली होती, बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या. पण मी शेजाऱ्याशी बोलण्याच्या नादात कधी घरी पोहोचलो होतो ते मला समजलेच नाही. याचा अर्थ सहा वाजून गेले तरी पार्टी अजून संपली नव्हती.

मी उलट्या पावली जिने उतरून बिल्डिंगच्या बाहेर पडलो. मला पुन्हा प्रश्न पडला. आता काय करावे? कुठे जावे? मी वाट फुटेल तिथे रस्त्याने चालत राहिलो. अशीच दहा पंधरा मिनिटे चाललो असेन आणि माझा मोबाईल वाजला. मिसेस बोलत होती. "अहो, कुठे आहात? या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात." मला किती आनंद झाला म्हणून सांगू! मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना! हा! हा!! हा!!

3 comments:

  1. एक उनाड लेख..👌
    उत्तम.....
    मला एक विचारायचे होते, समजा तुम्हाला पार्टी करायचीय घरी,अन सौ ला बाहेर थांबायला सांगितले तर... काय होईल😊

    ReplyDelete
  2. छान लेख 👌👌 तुम्हीं माझा ही ब्लॉग वाचू शकता
    www.swamini08.ml

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेकरिता आभार! मी आपला ब्लॉग वाचला, आणि आवडलाही.

      Delete