Monday 3 April 2017

केला इशारा! 'कट्टी' आणि 'बट्टी'चा.


          सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. आता रोजच्या येण्याजाण्यामुळे माझी त्या मुलीशी थोडीफार तोंडओळख झाली होती.

          एके दिवशी काय झाले, मला माझ्या रोजच्या सीटवर जागा मिळाली नाही. त्या मुलीपासून दूरच्या सीटवर मी बसलो होतो. पण तेथून ती मुलगी मला दिसत होती. आणि तीसुद्धा मला बसल्या जागेवरून पहात होती. आज 'पीटी'च्या ड्रेसमध्ये तर ती एवढी गोड दिसत होती म्हणून सांगू!! मला कोण जाणे सहज तिची गंमत करायची लहर आली.मी माझी जीभ हळूच थोडी बाहेर काढून तिला वाकुली दाखवली. तर ती मला नुसतंच बघत बसली. पुन्हा मी तिला हळूच तोंड वाकडं करून दाखवलं. तरी तिचा प्रतिसाद शून्यच. मग मी तिला माझे डोळे तिरळे करून दाखवले. मला वाटलं आता तरी ती खुद्कन हसेल. पण पहातो तर काय!? तिने हळूच आपला उजवा नाजूक हात उचलला आणि करंगळी दाखवून मला 'कट्टी'चा इशारा केला.

          अरे देवा! हे काय झाले!? मी तिची प्रेमाने गंमत करायला गेलो, तर माझं बाळ रुसलं कि हो माझ्यावर. कदाचित तिचं अगोदरच काही बिनसलं असावं किंवा गंमतीचा तिचा मूड नसावा. आता काय करू? काही समजेना. मला फार वाईट वाटू लागले.

          अचानक मला आठवलं. आमच्या लहानपणी कोणी आपल्याशी 'कट्टी' केल्यावर त्याच्याशी पुन्हा दोस्ती करायची असेल तर आम्ही काय करायचो ते! मी माझा उजवा हात उचलला. तर्जनी आणि मध्यमाचे बोट एकत्र जुळवले आणि तिला हळूच 'बट्टी'चा इशारा करून दाखवला. तर पुन्हा तीने 'कट्टी' करून दाखवली. मी पुन्हा 'बट्टी' दाखवली. पण माझ्या बाळाचा रुसवा काही जाईना. तिने पुन्हा 'कट्टी' दाखवली. आता मी काकुळतीने आर्जव केल्यासारखा 'प्लिज'चा चेहरा करून मान हलवून तिला 'बट्टी' दाखवली.

           आणि काय आश्चर्य! माझं बाळ खुद्कन हसलं कि हो!! आणि मला हाताने 'बट्टी' दाखवली. मला किती आनंद झाला म्हणून सांगू. मीसुद्धा पुन्हा तिला 'बट्टी' दाखवली. आणि पुन्हा आमची दोस्ती झाली.

          किती गंमत असते नाही या 'कट्टी' आणि 'बट्टी'च्या भाषेची!? 'कट्टी' आणि 'बट्टी' ही भारतात परंपरेने चालत आलेली, लहान मुलांमध्ये हातांच्या इशाऱ्याने वापरली जाणारी एक सांकेतिक भाषा आहे. 'कट्टी' आणि 'बट्टी'ची भाषा आपण एकमेकांचे शत्रू आहोत की मित्र आहोत हे दर्शवण्याकरिता वापरली जाते. ही भाषा का कोण जाणे, लहान मुलांना शिकवावी लागत नाही. ते एकमेकांचे पाहूनच आपोआप ती शिकत असतात.

          'कट्टी'चा सर्वसाधारण अर्थ असा की 'तू मला आवडत नाहीस. मला तुझ्याशी बोलायचं नाहीए. मला तुझा राग आलाय. आता आपले संबंध संपलेत. तू आतापासून माझा मित्र राहिलेला नाहीस' असा काहीसा आहे. कट्टी बऱ्याचदा एकतर्फी घेतली जाते. एखाद्याशी 'कट्टी' घेताना त्याला आपल्या एका हाताची करंगळी वर करून दाखवली जाते.

          'बट्टी'चा सर्वसाधारण अर्थ असा की 'आपल्यातले मतभेद आता मिटलेत. आपले भांडण आता संपलं आहेे. माझी आता तुझ्याविषयी काही तक्रार नाही. आपण आता पुन्हा मित्र झालो आहोत' असा काहीसा आहे. एखाद्याशी 'बट्टी' करताना एका हाताची तर्जनी आणि मध्यमा एकत्र जुळवून, साधारण आपण बंदूक ताणतो तसे एकमेकांना दाखवली जातात. अर्थात प्रत्येक प्रांताप्रमाणे ह्या हातांच्या इशाऱ्यांमध्ये थोडाफार फरक असू शकतो.

          मला आठवतं, लहानपणी आम्ही 'कट्टी' घेताना एकमेकांच्या करंगळीत एकमेकांची करंगळी अडकवायचो आणि एवढ्या जोऱ्यात पिरगळायचो, की बोटांना जोराची कळच लागली पाहिजे. आणि 'बट्टी' करताना एकमेकांच्या बोटांवर 'बट्टी'ची दोन बोटं टेकवून आपापल्या 'बट्टी'ची पापी घ्यायचो.

          ह्याच 'कट्टी' आणि 'बट्टी'चे आजकाल आधुनिक रूप आपल्याला 'फेसबुक'वर पहायला मिळतेय. त्यावर एखाद्याशी 'कट्टी' घ्यायची असेल तर त्याला 'unfriend' करायचं. आणि पुन्हा 'बट्टी' करायची असेल तर त्याला पुन्हा 'friend request' पाठवायची. लहानपणी खेळलेला 'कट्टी' आणि 'बट्टी'चा खेळ आपल्याला पुन्हा 'फेसबुक'च्या माध्यमातून खेळायला मिळतोय, आणि फिरून पुन्हा आपल्याला आपले बालपण अनुभवायची संधी मिळतेय. हे किती आश्चर्य म्हणायचे!

          चला तर मग, माझ्या या लेखाच्या निमित्ताने आपण आपल्या बालपणी घेतलेल्या 'कट्टी' आणि 'बट्टी'च्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.

5 comments:

  1. Replies
    1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

      Delete
  2. Khup masta lekh..baalpan athavle👶😁

    ReplyDelete
  3. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

    ReplyDelete