Sunday, 16 July 2017

तुमचेही काही नवीन शिकणे अर्धवट राहिले आहे का?



        ह्या लेखाद्वारे आज मी तुमच्याशी थोडेसे हितगुज करणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनुभवाला येणाऱ्या एका गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे.

          आपल्या प्रत्येकाला काहीना काही गोष्टींची आवड असते. त्याकरिता आपण त्या गोष्टी शिकायला सुरवात करतो. कोणी गाणं गायला, कोणी एखादे वाद्य वाजवायला, कोणी पेंटींग करायला, कोणी समाजकार्य करायला तर कोणी एखादे वाहन चालवायला शिकत असतो.

        पण काहीना काही कारणाने त्या शिकण्यात खंड पडतो. त्याची कारणे प्रत्येक व्यक्तीपरत्वे अनेक असू शकतात. कधी योग्य सुरुवात नसते. तर कधी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कधी शारीरिक, आर्थिक किंवा इतर अनेक अडचणी येतात. आणि आपण हातात घेतलेले कार्य सोडून देतो. आपल्या मनातली काही नवीन शिकण्याची इच्छा अपूर्ण राहून जाते. जसजसे दिवस, वर्षे जातात तसतसे आपले मन आपल्याला सतत खाऊ लागते. मनाला एक हुरहुर लागून रहाते. सारखं वाटत रहातं, की अरे! तेव्हा आपण ते शिकणं अर्धवट सोडलं नसतं तर आतापर्यंत कुठल्या कुठे पोहोचलो असतो. आता आपलं आयुष्य किती वेगळं असतं. त्या संबंधित विषयात आपण आतापर्यंत कितीतरी निपुण झालेलो असतो.

         मीसुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी एक नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली होती पण काही कारणाने माझे ते शिकणे अर्धवट राहिले होते. लहानपणापासूनच मला वाचनाचा भयंकर नाद. वाचण्याच्या प्रकारात खास आवडनिवड होती असे काही नाही. जे दिसेल ते, जे मिळेल ते मी वाचत असे. मित्रमंडळींकडून त्यांच्या पालकांनी वाचायला आणलेली पुस्तके, मासिकेही मी मागून आणून वाचत असे. बऱ्याचदा रस्त्यावर पडलेले कागदाचे चिटोरेही उचलून मी वाचत असे. कधीकधी काही वाचायला नसेल तर अगोदर वाचलेलं साहित्य मी पुन्हा पुन्हा वाचत असे. अशा प्रकारे बऱ्याचदा एकाच पुस्तकाची माझी असंख्य पारायणे झालेली आहेत.

       तीस वर्षांपूर्वी किंग्जसर्कल (आजचे महेश्वरी उद्यान) येथे विक्रेते रस्त्यांवर जुनी पुस्तके घेऊन विकायला बसत. त्यांच्याकडे अगदी स्वस्तात जुनी पुस्तके विकत मिळत. दर दोन चार दिवसांनी त्यांच्याकडे माझी एखादी फेरी ठरलेली असे. तेव्हा असेच एकदा मला तिथे 'Learn urdu in 30 days' हे पुस्तक मिळाले. ते वाचून मला उर्दू शिकण्याची भयंकर उर्मी झाली. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्यातील सर्व पाठ मी गिरवले. सर्व मूळाक्षरांचा लेखी सराव केला. मला उर्दू लिहायला आणि वाचायला येऊ लागले. पण त्याचा अर्थ समजत नसे. म्हणून मी भेंडीबाजार येथून १ली ते ४थी पर्यंतची मदरसा आणि बालभारतीची उर्दू मिडीयमची पुस्तके आणली. त्यांचा अभ्यास केला. आता मला थोडे थोडे उर्दू समजू लागले. तरी काही शब्द समजायला कठीण पडत. म्हणून पुन्हा भेंडीबाजार येथे जाऊन उर्दूची भली मोठी डिक्शनरी घेऊन आलो. काही शब्द अडले की मी त्यात बघायचो. उर्दू जाणणारे दोन मुस्लिम मित्र बनवले. त्यांच्याकडून मी शंका निवारण करून घेई. ते 'इन्कलाब' उर्दू वृत्तपत्र व इतर उर्दू पुस्तकं वाचीत, तेव्हा मी त्यात डोकावे. तेव्हा मित्रमंडळींनी मला फार पिडलं. गमतीत मला म्हणायचे "काय रे? कोण्या मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडलायस का?" कोणी म्हणे "धर्मांतर करणारेस वाटतं?" पण मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. आणि शेवटी मी बऱ्यापैकी उर्दू लिहायला, वाचायला आणि समजायला लागलो.

       पण थोड्याच दिवसांत माझे लग्न झाले. आणि घरसंसारात पडल्यावर जे सर्वांचे होते तेच माझे झाले. गेली तीस वर्षे माझा उर्दूशी संपर्कच राहिला नाही. मी बरचसं विसरून गेलोय. हातातोंडाशी आलेला घास खायचा राहून गेला.

      आता सारखं वाटू लागलंय, की उर्दूचा पुन्हा सराव करावा. मोबाईलच्या जमान्यात आता तर उर्दू शिकणे फारच सोपे झालंय. अँड्रॉइडवर उर्दू शिकण्याचे विविध प्रकारचे अप्लिकेशन, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आहेत. संसारातून जरा मोकळा झालो की मी माझी ही अपूर्ण राहिलेली 'उर्दू' आणि 'मोडी लिपी' शिकण्याची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे.

        तुम्हीही तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची शिकायला सुरवात केली असणार, पण काहीना काही कारणाने ते पूर्ण करण्याचे राहून गेले असणार याची मला खात्री आहे. मला आशा आहे, की माझ्या ह्या लेखाने आपण प्रेरित होऊन, आपल्याला आपले नवीन शिकणे अर्धवट राहिलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण होईल. आणि ती पूर्ण होण्याच्या दिशेने आपली पाऊले पुन्हा पडू लागतील. चला तर मग, आपण सर्वांनी मिळून निश्चय करू आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ, की आपल्या अर्धवट राहिलेल्या नवीन गोष्टी शिकणे पूर्ण होवो.

Friday, 14 July 2017

म्यांव! म्यांव!! म्यांव!!!



          माझ्या लहानपणी माझ्याबाबतीत शाळेत घडलेला हा एक गमतीदार किस्सा मी आज तुमच्या बरोबर शेअर करतोय.

          मी तेव्हा इयत्ता चौथीत होतो. आणि वर्गात इतिहासाचा तास चालू होता. वर्गात वीसेक मुलं आणि वीसेक मुली असतील. सर्व चिडीचूप बसून सरांचे शिकवणे ऐकत होते. मी वर्गातल्या मधल्या भागातील बेंचवर बसलो होतो. हातातल्या पेन्सिल आणि खोडरब्बरशी माझा चाळा चालू होता.

         आणि अचानक माझ्या हातातला खोडरब्बर माझ्या हातातून निसटून माझ्या बेंचखाली कुठेतरी पडला. मी बेंचखाली वाकून दोन पायावर बसलो आणि माझा खोडरब्बर शोधू लागलो. मी इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय. पण तो मला काही सापडेना. मी बसल्या बसल्या सरकत पुढच्या बेंचखाली गेलो.

         मी खोडरब्बर शोधण्यात इतका गुंग होऊन गेलो, की मी कुठे आहे आणि काय करतोय याचे मला भानच राहिले नाही. मी माझ्या मनातच एवढा रमलो की खोडरब्बर शोधता शोधता माझ्या तोंडून मी हळूहळू आवाज करू लागलो. कसा माहितेय!!? 

         "म्यांव! म्यांव!! म्यांव!!!" असा मांजरीसारखा! मला हे 'म्यांव म्यांव' फारच आवडले. हळूहळू माझं 'म्यांव म्यांव' फारच जोरात व्हायला लागले. मी बेंचखाली रांगु लागलो. सर तिकडे शिकवत होते आणि इथे माझे तोंडाने 'म्यांव म्यांव' करत खोडरब्बर शोधणे चालू होते.

         आणि कोण जाणे मला अचानक सारं शांत शांत वाटायला लागलं. सरांचा शिकवण्याचा आवाज मला ऐकू येईनासा झाला. मी भानावर आलो. म्हटलं सगळे गेले कुठे? म्हणून मी बेंचखालून डोके बाहेर काढून वर बघितले तर काय!!?......

          सरांसकट सर्व मुलं मुली माझ्या बेंचभोवती कोंडाळं करून मला गुपचूप पाहताहेत. माझी बोलती बंद!!! हे पाहून सर्व मुलं मुली माझ्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले. सरांनी माझ्या कानाला धरून मला उभे केले. आणि मग त्यांनी माझे काय हाल केले असतील याची तुम्ही कल्पनाच न केलेली बरी!!!

Sunday, 9 July 2017

आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे



          मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.

         आणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले "नमस्कार! कसे आहात तुम्ही?" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते! बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. न जाणो खरंच ते माझ्या ओळखीचे असतील आणि मी त्यांना विसरून गेलो असेल, तर उगाच त्या बिचार्यांना वाईट वाटायचं.

          मीसुद्धा नमस्कार केला "नमस्कार! काय म्हणताय?" पुढे दोन चार मिनिटे आमच्यात त्या कार्यालयातील असणाऱ्या आमच्या कामाबद्दल सर्वसाधारण बोलणे चालले. पण अजूनही माझी ट्यूब काही पेटेना की मी त्यांना अगोदर कुठे भेटलोय ते! मीसुद्धा भिडेखातर ते गृहस्थ जसे बोलतील तसे त्याला अनुसरून माझे संभाषण सुरू ठेवले.

         आणि अचानक त्या गृहस्थांनी मला विचारले "तुमच्या ऑफिसमधले ते अमुक अमुक रिटायर झाले का हो?" मी विचारले "कोण हो?"  गृहस्थ "ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे?" मी "छे हो! अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही?" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले "तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना?" मी "नाही हो! मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय." गृहस्थ "तुम्ही जोशी ना?" मी "नाही हो! मी काळे." गृहस्थ "माफ करा हं! मी तुम्हाला जोशीच समजलो. पण तुम्ही अगदी डिट्टो त्या जोश्यांसारखेच दिसता हो, म्हणून माझा गैरसमज झाला. माफ करा." असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आणि मी अवाक् होऊन  त्यांना जाताना पहात बसलो.

         बऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी दुसराच समजून आपली त्याच्याशी घनिष्ठ ओळख असल्यासारखी आपल्याशी बोलू लागते. आपली चौकशी करू लागते. आणि आपल्याला जेव्हा समजते की समोरच्याला अपेक्षित असणारी व्यक्ती आपण नाही आहोत, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीचा आपल्याविषयी गैरसमज कसा काय झाला? आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल? कोण असेल ती? काय करत असेल? असा अनुभव आपल्या सर्वांनाच बहुतेक वेळा आला असेल याची मला खात्री आहे.

          असे का होते? याचे उत्तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. तेव्हा केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले होते की संपूर्ण जगभरात एकसारखी दिसणारी, एकाच वयाची, एकाच रंगरूपाची आणि अंगकाठीची किमान सात व्यक्ती एकाचवेळी जगत असतात. फक्त त्या सात व्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ न शकल्याने त्यांना समजतच नाही की आपल्यासारखीच दिसणारी जगभरात एकूण सात माणसं फिरताहेत. माझ्या मनात कधी कधी एक गमतीदार विचार येतो, की कदाचित विधाता वेगवेगळे मॉडेल बनवून बनवून आता थकला असेल. त्याची कल्पनाशक्तीसुद्धा आता बोथट झाली असेल. कदाचित कंटाळलाही असेल. म्हणूनच विधाता आता मनुष्यप्राणी बनवायला पुन्हा पुन्हा तोच तो साचा तर वापरत तर नसेल!?

          अहो, पूर्वीतर माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की माझ्या भावाने तुला मुंबईत इथे पाहिला, माझ्या बाबांनी तुला मुंबईत तिथे पाहिला. आणि मी तर तिथे तेव्हा गेलेलोच नसायचो. मला फार आश्चर्य वाटायचे. मुंबईत फिरणाऱ्या माझ्या डुप्लिकेटला भेटण्याची तेव्हा मला फार उत्सुकता असायची. पण मला तो कधी भेटला नाही.

          हो! माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा. मी जिथे जाईल तिथे लोकं मला त्याच्या नावाने बोलवायचे. अगदी माझं लग्न ठरलं तेव्हाही माझ्या सासुरवाडीची लोकं एकमेकांना म्हणायची. "आपला होणारा जावई ना, अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो!!!" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:

         असो. आपण नेहमीच वर्तमानपत्र आणि मासिकांत वेगवेगळ्या हिरो हिरोईनच्या डुप्लिकेटचे फोटो पहात असतो. चित्रपटावरून एक आठवलं. १९७८ साली 'नसबंदी' नावाचा आई. एस. जोहर यांचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये पाच नायक होते. पण ते सर्वच्या सर्व त्या काळातील प्रसिद्ध हिरोंचे डुप्लिकेट होते. चित्रपट निर्माते असे डुप्लिकेट कुठून शोधून आणतात कोण जाणे? आमचेच डुप्लिकेट आम्हाला कसे भेटत नाहीत ते!!!

         चित्रपटाप्रमाणे राजकारणातसुद्धा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर केला जात होता. मी तर कुठेतरी वाचलं होतं की 'हिटलर'नेसुद्धा आपल्यासारखेच दिसणारे सात आठ हिटलर जमवले होते. अतिमहत्वाच्या व्यक्ती ऐतिहासिक (की पुराण?) काळापासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याकरिता आणि त्यांना नामोहरम करण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर करीत असत.

         पुन्हा असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ह्या भूतलावर आपल्या प्रत्येकाचे सात सात डुप्लिकेट अस्तित्वात आहेत. ना जाणो कधी ते आपल्यासमोर येऊन उभे ठाकतील ह्याचा काय भरवसा? त्यामुळे, जागे रहा. रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर त्या 'अंगुर' चित्रपटातील संजीवकुमारसारखं आपणसुद्धा इकडचा त्या घरात आणि तिकडचा ह्या घरात अदलाबदली व्हायचो.

Sunday, 2 July 2017

नियतीचे वर्तुळ



       रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.

        रेखाचे वडील तीन वर्षांपूर्वीच एका खाजगी शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाले होते. त्यांना रिटायरमेंटच्या मिळालेल्या पैशाचा बराचसा भाग त्यांच्या स्वतःच्याच आजारपणावर खर्च होत होता. दोन वर्षांपूर्वी रेखा बीए बीएड झाल्यावर त्यांनी तिला आपल्याच शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लावले होते.

       सुरवातीला एक वर्ष रेखाचे शाळेेत शिकवण्यात मन रमायचे नाही. तिचे शाळेत फक्त पाट्या टाकण्याचे काम चालू होते. रोज सकाळी उठायचे, आपलं आवरायचं, ट्रेन पकडून शाळेत जायचं, तिथे पाचसहा तास शिकवून परत ट्रेनने घरी यायचं. घरी येऊन घरची रोजची कामं उरकायची, की संपला दिवस. आयुष्य अगदी निरस झाल्याचं वाटत होतं. ती तरुण होती. अविवाहित होती. आपल्या तारुण्यातील उमेदीचे दिवस शाळेच्या चार भिंतीत वाया जात असल्याचे तिला सतत वाईट वाटे.

      आणि अचानक एके दिवशी तिच्या आयुष्यात आनंद फुलला. एका वर्षांपूर्वी शिपायाने तिला प्रिन्सिपल मॅडमनी बोलावल्याचा निरोप दिला. आज क्लार्क कामावर आला नव्हता. मंत्रालयातून काही महत्वाच्या कागदपत्रांवर आजच्या आज सह्या करून आणणं आवश्यक होतं. मॅडमनी रेखाला विनंती केली. शाळेच्या कटकटीतून एक दिवस सुटका होईल म्हणून रेखा आनंदाने मंत्रालयात जायला तयार झाली.

       रेखा एका हातात कागदपत्रांची पिशवी, दुसऱ्या हातात छत्री आणि खांद्यावर पर्स अडकवून बसस्टॉपवर जायला निघाली. बघते तर काय? बसस्टॉपवर मंत्रालयाला जाणारी एक डबलडेकर बस नुकतीच निघण्याच्या तयारीत होती. तिने बसकडे धाव घेतली. त्याबरोबर बस चालू लागली. रेखा धावत धावत बस पकडायला गेली. बसचा दांडा तिच्या हातात आला पण फुटबोर्डवर चढताना तिचा एक पाय घसरला. ती अर्धी फुटबोर्डवर आणि अर्धी खाली लटकू लागली. रेखाचा जीव खालीवर झाला. वाटलं आता सगळे संपले. पण तेवढ्यात एका राकट हाताने तिच्या कंबरेला विळखा घातला आणि तिला अलगद वर उचलून खेचले. रेखाची छाती धडधडत होती. तिचा श्वास जोरजोरात चालत होता. जीवनमरणाचा फक्त एका क्षणाचा तो खेळ होता. तिने थँक्स म्हणायला आपल्या उपकारकर्त्याकडे पाहिले, आणि ती पहातच बसली.

        एक रांगड्या व्यक्तिमत्वाचा, उंचपुरा, गोरा, घाऱ्या डोळ्यांचा आणि कपाळावर मस्त केसांची झुलपं असलेला तो एक तरुण होता. त्याने तिची पडलेली पिशवी उचलून तिला सीटवर बसायला मदत केली. तिची परवानगी घेऊन तो तिच्या बाजूच्याच सीटवर बसला. सहज रेखाचे त्याच्या हातांकडे लक्ष गेले तर त्याच्या हातातसुद्धा रेखाकडे असलेल्या कागदपत्रांच्या पिशवीसारखीच एक पिशवी होती. तिने त्याची चौकशी केली. त्याचे नांव प्रदीप होते. जवळच्याच एका शाळेत तोही शिक्षक होता. रेखाप्रमाणेच प्रदीपही मंत्रालयात कागदपत्रांवर सह्या आणायला चालला होता.

       तो संपूर्ण दिवस रेखा आणि प्रदीप एकत्र होते. मंत्रालयातून कागदपत्रांवर सह्या मिळायला फारच उशीर झाला. ते मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये जेवले. त्यांच्यात दिवसभर शाळेविषयी गप्पा झाल्या. तिने आडून आडून प्रदीपची चौकशी केली. तो अविवाहित होता. एके ठिकाणी पेईंगगेस्ट म्हणून रहात होता. घरी परत येताना ते एकत्रच आले. त्याने तिला तिच्या घराजवळ सोडले. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले. रेखाला तिची संगत प्रदीपच्या डोळ्यात आवडलेली दिसली.

         आणि तिचा होरा खरा ठरला. दोनच दिवसात प्रदीपचा सहजच तिच्या चौकशीचा फोन आला. आणि मग वरचेवर येत गेला. दोघं एकमेकांत मनाने गुंतत गेले. संध्याकाळचं एकत्र हिंडणेफिरणे होऊ लागले. प्रेमाच्या आणाभाका दिल्या आणि घेतल्या गेल्या. रेखाचे चांगलेचुंगले कपडे घालणे, प्रदीपसोबत हॉटेलिंग करणे होऊ लागले. आता तिचे मन शाळेत चांगलेच रमू लागले.

        असेच दोनचार महिने गेले, आणि अचानक एके दिवशी प्रदीपची संस्थेच्या दूरच्या शहरातील एका शाळेत बदली झाली. आता महिनोन्महिने त्यांची गाठभेट होत नव्हती. फोनवरच कधीतरी त्यांचे थोडेफार बोलणे होई. एकमेकांना भेटायला त्यांचा जीव तरसे.

       हळूहळू रेखाचे पूर्वीचे एकाकी आणि निरस जीवन पुन्हा सुरू झाले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस ती प्रदीपच्याच विचारात रस्ता ओलांडत होती, आणि अचानक एका कारखाली ती येतायेता वाचली. कारने अगदी तिच्याजवळ येऊन ब्रेक मारला. पण तिला कारचा हलकासा धक्का लागलाच आणि ती रस्त्यावर तोल जाऊन पडली. लगेच कारमधून तीस बत्तीस वर्षाचा एक सुंदर आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण उतरला. त्याने रेखाला हाताचा आधार देऊन उभे केले. रस्त्यावर पडल्यामुळे तिच्या उजव्या पायाच्या ढोपराला फक्त थोडंसं खरचटलं होतं. अपघात पाहून आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. लोक तावातावाने त्या तरुणाला बोलू लागले. लगेच रेखाने आपलीच चूक असून आपण पूर्ण सुरक्षित असल्याचे लोकांना सांगितले. गर्दी पांगली. त्या कारवाल्या तरुणाने रेखाला डॉक्टरकडे उपचाराकरिता चलण्याची विनंती केली आणि तिला आपल्याच कारमध्ये बसवले. कारमध्ये त्या तरुणाची एक पाच वर्षांची गोड मुलगीही बसली होती. त्या तरुणाने रेखाला आपली ओळख संजय आणि आपल्या मुलीचं नांव निहारिका अशी करून दिली. संजयने रेखाला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या जखमांवर मलमपट्टी करून तिला तिच्या घराजवळ आणून सोडले.

         रेखाचा गुढगा दुखत असल्याने ती शाळेत जाऊ शकत नव्हती. तिच्या तब्येतीची विचारपूस करायला संजय निहारिकाबरोबर रोज तिच्या घरी येत होता. निहारिका फार गोड मुलगी होती. ती नुकतीच शाळेत जायला लागली होती. ती आपल्या शाळेच्या गमती जमती रेखाला सांगून फार हसवत असे. त्या दोघांची लवकरच छान गट्टी जमली. पण संजयने जेव्हा सांगितले की तीची आई दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने वारली, तेव्हा रेखाला फार वाईट वाटले. संजयने रेखाला रोज संध्याकाळी एखादा तास निहारिकाच्या शाळेचा अभ्यास घ्यायला घरी येण्याची विनंती केली.
काही दिवसांनी रेखा रोज संध्याकाळी निहारिकाचा अभ्यास घ्यायला संजयच्या बंगल्यावर जाऊ लागली. बंगला श्रीमंत वस्तीत आणि राजेशाही होता. नोकर चाकर, दोन तीन गाड्या, सुखासीन वस्तूंनी परिपूर्ण होता. संजय पिढीजात श्रीमंत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो दोन चार कंपन्यांचा एकुलता एक वारस होता. पण कंपन्यांची जबाबदारी व्यवस्थापकांवर टाकून मित्रमैत्रिणींबरोबर छानछौकी करण्यात, आयत्या मिळालेल्या श्रीमंतीचा उपभोग घेण्यातच त्याचा जास्त कल होता.

      रेखा निहारिकाचा अभ्यास घेतेवेळी संजय बर्याच वेळा घरी दिसे. कधी कधी निहारिकाच्या अभ्यासाच्या निमित्ताने रेखाशी बोलण्याचा प्रयत्न करे. कधी उशीर झाल्यास रेखाला कारने घरी सोडवे. काहीना काही निमित्ताने रेखाला महागड्या वस्तू भेटीदाखल देई. रविवारी रेखा आणि निहारिकाला तो बागेत फिरवून आणे. त्यांना कधी जेवायला हॉटेलात तर कधी सिनेमाला नेई.

        संजय आपल्याकडे आकृष्ट झालेला रेखाला स्पष्ट जाणवत होते. तिलाही हे सर्व हवेहवेसे वाटत होते. रेखाच्या घरची पिढीजात गरिबी असल्याने हे तिला सर्व नवे होते. आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण येतील याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिला आताशा प्रदीपची आठवणही येईनाशी झाली होती. मनातल्या मनात ती प्रदीप आणि संजयची तुलना करू लागली होती.

     आणि एक दिवस तिच्या अपेक्षेप्रमाणे संजयने तिला लग्नाची मागणी घातली. आईविना पोरकी झालेल्या निहारिकाला आईचा आधार देण्याची विनंती केली. रेखा जणू ह्याच क्षणाची वाट पहात होती. तिने त्याला आनंदाने होकार दिला. काही कारणाने संजयने सहा महिन्यानंतर लग्न करायचे ठरवले.

       आताशा प्रदीप रेखाच्या फोनवर तुटक बोलण्याने तर कधी फोन न उचलण्याने चिंतीत झाला होता. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. एक दिवस त्याने रजा काढून रेखाची भेट घेतली. रेखाने आपले लग्न ठरल्याचे सांगितले. प्रदीपने रेखाला आपल्या प्रेमाची आठवण करून दिली. पण रेखाने त्याच्याशी लग्न करून आयुष्यभर गरिबीचे चटके खात जगायला नकार दिला. भावनेच्या भरात वहावत गेल्याची आणि प्रदीपला शब्द देऊन बसल्याची तिने कबुली दिली. प्रदीप निराश होऊन आपल्या नोकरीच्या शहरी निघून गेला.

        रेखाचे आता संजयच्या घरी येणे जाणे वाढले. निहारिकाची काळजी घेण्याच्या निमित्ताने तिचे कधीकधी दोन दोन दिवस संजयच्या बंगल्यावर रहाणे होई. बऱ्याचदा संजय रात्री उशिरा घरी परते तेव्हा तिला त्याच्या तोंडाला दारू सिगरेटचा उग्र दर्प जाणवे. कधी त्याच्या मित्रमंडळींबरोबर बंगल्यावर पार्ट्या होत तेव्हा रेखाला काही हवं नको ते बघायला रात्री बंगल्यावर थांबायला लागे. रेखाला हे सर्व नाईलाजाने सहन करायला लागे.

      एक दिवस रेखा निहारिकाच्या शाळेच्या पिकनिकची तयारी करायला भल्या पहाटे संजयच्या बंगल्यावर पोहचली तेव्हा संजयच्या बेडरूममधून बाहेर पडणाऱ्या एका भडक हावभाव करणाऱ्या स्त्रीशी तिची गाठ पडली. रेखाला संजयच्या बाहेरख्यालीपणाची जाणीव झाली. तिने संजयला जाब विचारताच त्याने रेखापुढे सपशेल नांगी टाकली. पुन्हा असे न करण्याचे वचन दिले. रेखानेही झाल्यागोष्टीबद्दल संजयला माफ केले.

        पण एके दिवशी रेखाने पुन्हा एकदा संजयला एका बाजारू स्त्रीबरोबर मॉलमध्ये मजाहजा करताना पकडले. आता मात्र रेखाचे डोके भडकले. संजय घरी येताच तिने त्याला फैलावर घेतले. त्यावर संजयने तिलाच चार शब्द सुनावले. त्याचे राहणीमान असेच आहे आणि यापुढेही असेच राहील. निहारिका आणि बंगल्याचा सांभाळ करायला, घरी आल्यागेल्याचं बघायला कोणीतरी स्त्री हवी आहे म्हणून तो रेखाशी लग्न करतोय असे निर्लज्जपणे सांगून त्याच्या कारभारात अजिबात लक्ष घालू नकोस अशी रेखाला त्याने स्पष्ट तंबीच दिली.

         झाल्या प्रसंगाने रेखा कोसळून पडली. सुखी आणि श्रीमंत संसाराची तीने जी स्वप्ने पाहिली होती ती सर्व तिला भंगताना दिसू लागली. आपण संजयशी लग्न केले तर आपली त्या घरात फक्त मोलकरणीएवढीच लायकी असेल याची तिला जाणीव झाली. त्या घरात आपली काडीचीही किंमत असणार नाही हे तिला कळून चुकले. नवऱ्याचे प्रेम आणि सुख मिळणे ही तर दुरचीच गोष्ट राहिली.

        रेखाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. विचार करकरून डोके फुटायला आले. आणि शेवटी तिला तिच्या मनानेच उत्तर दिले. संजयशी लग्न केल्याने मिळणाऱ्या श्रीमंतीपेक्षा तिला तिच्या गमवावे लागणाऱ्या स्वाभिमानाचे मोल जास्त असल्याचे समजून आले. तिने संजयशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले.

      आता रेखा परत एकटीच जीवन जगतेय. गेल्या वर्षभरात तिच्या आयुष्यात झालेल्या वादळाने ती कोलमडून पडलीय. रात्र रात्र ती बिछान्यात तळमळत असते. क्षणभरही डोळ्याला डोळा लागत नाही. स्वतःच्या गरीब परिस्थितीमुळे संजयच्या श्रीमंतीला भुलून रेखाने केलेल्या प्रदीपच्या प्रेमाच्या विश्वासघाताने ती स्वतःच्या मनातून पार उतरून गेलीय. आता ती सतत प्रदीपचाच विचार करीत असते. प्रदीपबरोबरचं आपलं वागणं चूक होतं की बरोबर याचा ती निर्णय करू शकत नाहीये. रेखाने ज्या संजयकरिता प्रदीपच्या प्रेमाचा अव्हेर केला, त्याच संजयला सोडण्याचे रेखाच्या नशिबी आले. नियतीने आपले एक वर्तुळ पूर्ण केले होते.