Sunday, 16 July 2017

तुमचेही काही नवीन शिकणे अर्धवट राहिले आहे का?        ह्या लेखाद्वारे आज मी तुमच्याशी थोडेसे हितगुज करणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनुभवाला येणाऱ्या एका गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे.

          आपल्या प्रत्येकाला काहीना काही गोष्टींची आवड असते. त्याकरिता आपण त्या गोष्टी शिकायला सुरवात करतो. कोणी गाणं गायला, कोणी एखादे वाद्य वाजवायला, कोणी पेंटींग करायला, कोणी समाजकार्य करायला तर कोणी एखादे वाहन चालवायला शिकत असतो.

        पण काहीना काही कारणाने त्या शिकण्यात खंड पडतो. त्याची कारणे प्रत्येक व्यक्तीपरत्वे अनेक असू शकतात. कधी योग्य सुरुवात नसते. तर कधी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कधी शारीरिक, आर्थिक किंवा इतर अनेक अडचणी येतात. आणि आपण हातात घेतलेले कार्य सोडून देतो. आपल्या मनातली काही नवीन शिकण्याची इच्छा अपूर्ण राहून जाते. जसजसे दिवस, वर्षे जातात तसतसे आपले मन आपल्याला सतत खाऊ लागते. मनाला एक हुरहुर लागून रहाते. सारखं वाटत रहातं, की अरे! तेव्हा आपण ते शिकणं अर्धवट सोडलं नसतं तर आतापर्यंत कुठल्या कुठे पोहोचलो असतो. आता आपलं आयुष्य किती वेगळं असतं. त्या संबंधित विषयात आपण आतापर्यंत कितीतरी निपुण झालेलो असतो.

         मीसुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी एक नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली होती पण काही कारणाने माझे ते शिकणे अर्धवट राहिले होते. लहानपणापासूनच मला वाचनाचा भयंकर नाद. वाचण्याच्या प्रकारात खास आवडनिवड होती असे काही नाही. जे दिसेल ते, जे मिळेल ते मी वाचत असे. मित्रमंडळींकडून त्यांच्या पालकांनी वाचायला आणलेली पुस्तके, मासिकेही मी मागून आणून वाचत असे. बऱ्याचदा रस्त्यावर पडलेले कागदाचे चिटोरेही उचलून मी वाचत असे. कधीकधी काही वाचायला नसेल तर अगोदर वाचलेलं साहित्य मी पुन्हा पुन्हा वाचत असे. अशा प्रकारे बऱ्याचदा एकाच पुस्तकाची माझी असंख्य पारायणे झालेली आहेत.

       तीस वर्षांपूर्वी किंग्जसर्कल (आजचे महेश्वरी उद्यान) येथे विक्रेते रस्त्यांवर जुनी पुस्तके घेऊन विकायला बसत. त्यांच्याकडे अगदी स्वस्तात जुनी पुस्तके विकत मिळत. दर दोन चार दिवसांनी त्यांच्याकडे माझी एखादी फेरी ठरलेली असे. तेव्हा असेच एकदा मला तिथे 'Learn urdu in 30 days' हे पुस्तक मिळाले. ते वाचून मला उर्दू शिकण्याची भयंकर उर्मी झाली. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्यातील सर्व पाठ मी गिरवले. सर्व मूळाक्षरांचा लेखी सराव केला. मला उर्दू लिहायला आणि वाचायला येऊ लागले. पण त्याचा अर्थ समजत नसे. म्हणून मी भेंडीबाजार येथून १ली ते ४थी पर्यंतची मदरसा आणि बालभारतीची उर्दू मिडीयमची पुस्तके आणली. त्यांचा अभ्यास केला. आता मला थोडे थोडे उर्दू समजू लागले. तरी काही शब्द समजायला कठीण पडत. म्हणून पुन्हा भेंडीबाजार येथे जाऊन उर्दूची भली मोठी डिक्शनरी घेऊन आलो. काही शब्द अडले की मी त्यात बघायचो. उर्दू जाणणारे दोन मुस्लिम मित्र बनवले. त्यांच्याकडून मी शंका निवारण करून घेई. ते 'इन्कलाब' उर्दू वृत्तपत्र व इतर उर्दू पुस्तकं वाचीत, तेव्हा मी त्यात डोकावे. तेव्हा मित्रमंडळींनी मला फार पिडलं. गमतीत मला म्हणायचे "काय रे? कोण्या मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडलायस का?" कोणी म्हणे "धर्मांतर करणारेस वाटतं?" पण मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. आणि शेवटी मी बऱ्यापैकी उर्दू लिहायला, वाचायला आणि समजायला लागलो.

       पण थोड्याच दिवसांत माझे लग्न झाले. आणि घरसंसारात पडल्यावर जे सर्वांचे होते तेच माझे झाले. गेली तीस वर्षे माझा उर्दूशी संपर्कच राहिला नाही. मी बरचसं विसरून गेलोय. हातातोंडाशी आलेला घास खायचा राहून गेला.

      आता सारखं वाटू लागलंय, की उर्दूचा पुन्हा सराव करावा. मोबाईलच्या जमान्यात आता तर उर्दू शिकणे फारच सोपे झालंय. अँड्रॉइडवर उर्दू शिकण्याचे विविध प्रकारचे अप्लिकेशन, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आहेत. संसारातून जरा मोकळा झालो की मी माझी ही अपूर्ण राहिलेली 'उर्दू' आणि 'मोडी लिपी' शिकण्याची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे.

        तुम्हीही तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची शिकायला सुरवात केली असणार, पण काहीना काही कारणाने ते पूर्ण करण्याचे राहून गेले असणार याची मला खात्री आहे. मला आशा आहे, की माझ्या ह्या लेखाने आपण प्रेरित होऊन, आपल्याला आपले नवीन शिकणे अर्धवट राहिलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण होईल. आणि ती पूर्ण होण्याच्या दिशेने आपली पाऊले पुन्हा पडू लागतील. चला तर मग, आपण सर्वांनी मिळून निश्चय करू आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ, की आपल्या अर्धवट राहिलेल्या नवीन गोष्टी शिकणे पूर्ण होवो.

3 comments:

 1. Very very true Sachin.You dont know this writing will motivate many people.

  ReplyDelete
  Replies
  1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

   Delete
 2. अरे वा! मीही ईन्कलाबच वाचायचो. पण फक्त संडे ईन्कलाब.

  ReplyDelete